Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 42

द्वितीय पुस्तक

स्तोत्रसंहिता 42–72

संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील.

हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते,

तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.

माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे.

मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?

रात्र आणि दिवस,

माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.

मला लोक सतत असे विचारीत आहेत.

“कुठे आहे तुझा परमेश्वर?”

या गोष्टींची आठवण करून

माझा आत्मा तुटत आहे:

कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या

विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो.

त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष

आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.

हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?

आतल्याआत का तू तळमळत आहेस?

परमेश्वराची आशा धर.

मी अजूनही माझा तारणारा

आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.

माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे;

तेव्हा मी यार्देन प्रदेशातून

आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून

तुमचे स्मरण करणार.

तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे,

सागर सागराला आव्हान करतो;

तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ

माझ्यावर झपाटून आदळत आहेत.

तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव

दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्‍या परमेश्वराची

मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो.

मी आरोळी मारून म्हणतो,

“हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक,

तुम्ही मला का विसरलात?

शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?”

माझे शत्रू दिवसभर

थट्टेने मला विचारतात,

“तुझा परमेश्वर कुठे आहे?”

यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.

हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास?

आतल्याआत का तळमळत आहेस?

परमेश्वरावर आपली आशा ठेव,

मी पुनः माझा तारणारा आणि

माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.