इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 106
इस्त्राएलाची बंडखोरी
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या.
कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल?
किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?
जे काही योग्य आहे ते करतात
आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर;
तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर.
मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा,
तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन,
आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले;
आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.
आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही;
त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले;
तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले,
यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला.
मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले,
आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले.
परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले.
त्यापैकी एकही जण वाचला नाही.
नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला
आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली.
परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले;
त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही.
रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली,
आणि त्यांनी देवाला आव्हान दिले.
त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले,
पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला.
त्यांनी छावणीत मोशे
आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले.
जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले,
आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले.
त्यांच्यात अग्नीने पेट घेतला;
अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले.
त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले.
आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी
आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली.
ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले,
ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या
आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.
म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू.
जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला,
त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.
नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला;
त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,
पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली,
आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही.
म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की,
मी त्यांना रानात मरू देईन.
त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन,
आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
त्यांनी बआल-पौराची पूजा केली,
आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.
त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले,
आणि त्यांच्यात मरी पसरली.
पण फिनहास मध्यस्थी उठला;
आणि मरी बंद झाली.
हे त्यास नितीमत्व असे
सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला,
आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले.
त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला,
आणि तो अविचाराने बोलला.
परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे
त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले,
व त्यांचे मार्ग शिकले.
आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली,
ते त्यांच्यासाठी सापळा बनले.
त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.
त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले,
त्यांनी आपली मुले आणि मुली,
ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला,
त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.
ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले,
आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले.
त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला,
त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला.
त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले,
आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले,
आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले.
अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला,
पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले,
आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.
तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली,
तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली,
आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली.
त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात
त्यांच्यावर दया येईल असे केले.
हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार.
आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर;
म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.
इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर,
ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो.
सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.”
परमेश्वराची स्तुती करा.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.