इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मत्त. 2
ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनास येतात
हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की;
‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता,
तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही
कारण तुझ्यातून असा सरदार निघेल
जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’”
मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली. देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
मिसर देशास पलायन
ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.” त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला. तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले.
बेथलेहेम येथील मुलांची कत्तल
तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले. यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असेः
“रामा येथे रडणे
व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे,
आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”
मिसराहून परतणे
पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला. परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला, व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.