Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

उत्प 33

याकोब व एसाव ह्यांच्यात झालेला सलोखा

याकोबाने वर पाहिले आणि पाहा, त्यास एसाव येताना दिसला आणि त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली. याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीस त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वांत शेवटी ठेवले. याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले. एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे?” याकोबाने उत्तर दिले, “तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे.” मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले. त्यानंतर लेआ व तिची मुले, मग राहेल व योसेफ एसावापुढे गेले आणि त्यांनी त्यास खाली वाकून नमन केले. एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.” एसाव म्हणाला, “माझ्या बंधू मला भरपूर आहे, तुझे तुला असू दे.” याकोब म्हणाला, “मी आपणाला विनंती करतो, असे नको, आता जर मी तुमच्या दृष्टीने खरोखर कृपा पावलो तर माझ्या हातून या भेटीचा स्विकार करा, कारण मी आपले तोंड पाहिले, आणि जणू काय देवाचे मुख पाहावे तसे मी तुमचे मुख पाहिले आहे आणि आपण माझा स्विकार केला. मी विनंती करतो की, मी आणलेल्या भेटीचा स्विकार करा. कारण देवाने माझे कल्याण केले आहे, आणि माझ्यापाशी भरपूर आहे.” याप्रमाणे याकोबाने एसावास आग्रहाची विनवणी केली आणि मग एसावाने त्यांचा स्विकार केला. मग एसाव म्हणाला, “आता आपण आपल्या वाटेस लागू. मीही तुझ्या पुढे चालतो.” परंतु याकोब त्यास म्हणाला, “माझी मुले लहान आहेत हे माझ्या स्वामीला माहीत आहे, आणि माझी मेंढरे व गुरेढोरे यांच्या पिल्लांची मला काळजी घेतली पाहिजे. मी जर त्यांची एका दिवशी अधिक दौड केली, तर सगळी जनावरे मरून जातील. तर माझे धनी आपण आपल्या सेवकापुढे जा. मी माझी गुरेढोरे, शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांना जितके चालवेल आणि माझी लहान मुलेही थकणार नाहीत अशा चालीने सावकाश चालेन व आपणास सेईर प्रदेशामध्ये येऊन भेटेन.” तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या मनुष्यातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो.” परंतु याकोब म्हणाला, “तसे कशाला? माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे.” तेव्हा त्याच दिवशी एसाव सेईरास परत जाण्यास निघाला. याकोब प्रवास करीत सुक्कोथास गेला. तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले आणि गुराढोरांसाठी गोठे बांधले, म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ पडले. याकोबाने पदन-अरामपासून सुरू केलेला प्रवास कनान देशातील शखेम शहरात सुखरूपपणे संपवला. त्या नगराजवळ त्याने आपला तळ दिला. नंतर त्याने जेथे आपला तंबू ठोकला होता ती जमीन शखेमाचा बाप हमोर याच्या लोकांकडून शंभर चांदीची नाणी देऊन विकत घेतली. त्याने तेथे एक वेदी बांधली आणि तिचे नाव “एल-एलोहे-इस्राएल” 1असे ठेवले.

Source notes (1)
  1. Footnote अर्थ-देव, इस्राएलाचा देव, इस्राएलाचा शक्तीशाली देव

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.