इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
निर्ग 11
दहावी पीडा: प्रथमवत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना
निर्ग. 3:21-22; 12:35-36
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील, तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.” मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता. मोशे लोकांस म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील. मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल. परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही यावरुन मी परमेश्वर इस्राएली व मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल. मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला. परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारो तुमचे ऐकणार नाही मी मिसर देशात पुष्कळ आश्चर्यकारक गोष्टी कराव्यात म्हणून असे होईल.” आणि मोशे व अहरोन यांनी सर्व आश्चर्ये फारोपुढे केली; परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्याच्या देशातून इस्राएल लोकांस बाहेर जाऊ दिले नाही.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.