Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 राजे 16

यानंतर परमेश्वर हनानीचा पुत्र येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते. “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे. तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन. बाशाच्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील व कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.” इस्राएलाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकिकत लिहीली आहे. बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र एला हा त्यानंतर राज्य करु लागला. तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वरास फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.

एलाची कारकीर्द

यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले. जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता. जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची सूड ऊगवला. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले. बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच जिम्रीने बाशाच्या घराण्याचा नाश केला बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.

जिम्रीची कारकीर्द

आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते. जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा सर्व इस्राएलांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता. तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला. नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने राजमहालाला आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले. आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. याने यराबामाप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलाच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करून उठला तेव्हाची हकिकतही या पुस्तकात आहे.

जिम्रीची कारकीर्द

इस्राएलाच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिब्नी याच्या बाजूचे असून, त्यास राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते. तिब्नीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्नी मारला गेला आणि अम्री राजा झाला. यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना, अम्री इस्राएलाचा राजा झाला. अम्रीने इस्राएलावर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता. त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार1 रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले. अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट, त्या गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता. नबाटाचा पुत्र यराबाम याने जी पापे केली तीच याने केली. यराबामाने इस्राएल लोकांसही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलावर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. व्यर्थ दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला. अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकिकत इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे. अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र अहाब हा राज्य करु लागला.

अहाबाची कारकीर्द

यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते सर्व अम्रीचा मुलगा अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता. नबाटाचा पुत्र यराबाम याने केले ते तर त्यास शुल्लक वाटले म्हणून की काय त्याने आणखी दुष्कृत्ये केली. एथबाल याची कन्या ईजबेल हिच्याशी त्याने लग्र केले. एथबाल हा सीदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बआल या दैवतांच्या भजनी लागला. शोमरोन येथे त्याने बआलाच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली. अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला. याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले. 2

Source notes (2)
  1. Footnote साधारण 68 किलोग्राम
  2. Footnote यहो. 6:26 पाहा

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.