इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
1 राजे 10
शबाची राणी शलमोनाला भेटण्यास येते
2 इति. 9:1-28
परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरूशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले. शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही. शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले. त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली. ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते खरे आहे. पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत, माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य. परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.” मग शबाच्या राणीने राजाला एकशे वीस किक्कार1 सोने, नजर केले. शिवाय मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान हिरे दिले. इस्राएलामध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले. हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली. शलमोन राजाने या लाकडाचा वापर परमेश्वराच्या मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलामध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही. दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला, जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
शलमोनाचे वैभव आणि त्याची कीर्ती
शलमोन राजाला दरसाल जवळपास सहाशे सहासष्ट किक्कार2 सोने मिळत राहिले. या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले. शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल सोने लागले. तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्या लहान ढालीस तीन माने सोने लागले. राजाने या ढाली “लबानोनाचे वन” येथे ठेवल्या. शिवाय राजा शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणात्याही राज्यात नव्हते. राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती. समुद्रावर राजा हिरामाच्या जहाजांबरोबर शलमोन राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत. शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुद्धी चातुर्य होते. पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणीत असे. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, सुगंधी मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
शलमोनाने केलेला घोडा व रथ ह्यांचा व्यापार
शलमोन राजाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे यांचा संग्रह होता. रथासाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यामध्ये रथ ठेवले. काही रथ त्याच्याजवळ यरूशलेमेमध्येही होते. राजाने इस्राएलाला वैभवाच्या शिखरावर नेले. यरूशलेम नगरात चांदी जमीनीवरील दगडधोंड्यासारखी होती आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. मिसर व सिलीसिया येथून शलमोन घोडे आणत असे. शलमोन राजाचे व्यापारी ते तांडेच्या तांडे खरेदी करत आणि तेथून ते इस्राएलमध्ये आणत. मिसरचा एक रथ साधारण सहाशे शेकेल चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत दिडशे शेकेल चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना हे रथ आणि घोडे नंतर विकत असत.
Source notes (2)
- Footnote साधारण 4,080 किलोग्राम
- Footnote साधारण 22,644 किलोग्राम
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.