Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

शास्ते 2

बोखीम येथे याहवेहचा दूत

याहवेहचा दूत गिलगालहून वर बोखीम येथे गेला आणि म्हणाला, “मी तुम्हाला इजिप्त देशातून काढून तुमच्या पूर्वजास शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात आणले. मी म्हणालो, ‘तुमच्याशी केलेला करार मी कधी मोडणार नाही, आणि तुम्ही या देशातील लोकांशी कोणतेही करार करू नका, परंतु तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका.’ तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही हे का केले? आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ”

जेव्हा याहवेहचा दूत या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, ते लोक मोठ्याने रडू लागले, आणि म्हणून त्या ठिकाणाचे नाव “बोखीम1” असे ठेवले. तिथे त्यांनी याहवेहला यज्ञ अर्पण केले.

आज्ञाभंग आणि पराभव

नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले. लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेली महान कृत्ये ज्यांनी पाहिली त्यांनी याहवेहची सेवा केली.

नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस2 येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले.

नंतर ती संपूर्ण पिढी त्यांच्या पूर्वजांना मिळाल्यानंतर, दुसरी पिढी उदयास आली, ज्यांना याहवेहबद्धल किंवा त्यांनी इस्राएलसाठी काय केले हे माहीत नव्हते. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली. त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली. याहवेहचा राग इस्राएलावर भडकला, त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांना लुटले. ज्यांचा ते सामना करू शकत नव्हते अशा त्यांच्या सभोवतालच्या सर्व शत्रूच्या हाती विकले. जेव्हा इस्राएली राष्ट्र त्यांच्या शत्रूविरुद्ध लढण्यास जात असे, तेव्हा याहवेहचा हात त्यांच्याविरुद्ध असून त्यांचा पराभव होत असे, जसे याहवेहने त्यांना वचन दिले होते. ते भयंकर संकटात होते.

तेव्हा याहवेहने त्यांना लुटारूंच्या हातून वाचविण्यासाठी शास्ते3 उभे केले. तरी देखील त्यांनी आपल्या शास्त्यांचे ऐकले नाही, परंतु व्यभिचारी मनाने इतर दैवतांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना करू लागले. त्वरेने ते आपल्या पूर्वजांच्या मार्गापासून बहकले, ज्यांनी याहवेहच्या आज्ञांचे पालन केले होते. जेव्हा याहवेहने त्यांच्यासाठी शास्ते उभे केले होते, ते शास्त्यांबरोबर होते आणि शास्तेच्या जीवनभर ते त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून त्यांना सोडवित होते; कारण जुलूम व त्रास देणाऱ्यांमुळे इस्राएली लोक विव्हळत असल्यामुळे याहवेहला त्यांची दया येऊ लागली होती. परंतु शास्ते मरण पावले की लोक योग्य ते करण्याचे सोडून त्यांचे पूर्वज करीत त्यापेक्षा अधिक वाईट आचरण करू लागले. ते इतर दैवतांची उपासना करीत व त्यांच्या पापी चालीरीतींकडे हट्टाने पुन्हा वळत.

यासाठी याहवेहचा क्रोध इस्राएलविरुद्ध भडकला आणि त्यांनी जाहीर केले, “कारण या इस्राएली राष्ट्राने त्यांच्या पूर्वजांशी मी केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे आणि माझे ऐकले नाही, यहोशुआ मरण पावल्यावर, यापुढे मी घालविलेल्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र त्यांच्यापुढून घालविणार नाही. इस्राएली लोकांची मी परीक्षा घेईन आणि त्यांच्या पूर्वजांप्रमाणे याहवेहच्या आज्ञेचे पालन ते करतात की नाही हे पाहण्यासाठी या राष्ट्रांचा मी उपयोग करेन.” याहवेहने त्या राष्ट्रांना तिथेच राहू दिले; यहोशुआच्या हातात देऊनही त्यांना एकदम घालवून दिले नाही.

Source notes (3)
  1. Footnote बोखीम म्हणजे विलाप करणारे
  2. Footnote किंवा तिम्नाथ-सेराह म्हणून सुद्धा ओळखले जाते
  3. Footnote किंवा पुढारी

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.