Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 शमुवेल 7

म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले. कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ—म्हणजेच वीस वर्षे राहिला.

शमुवेलाचा मिस्पाह येथे पलिष्ट्यांवर विजय

तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले. आणि शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने याहवेहकडे परत वळत आहात, तर तुम्ही अन्य दैवते व अष्टारोथचा त्याग करा; आणि याहवेहकडे चित्त लावून केवळ त्यांचीच सेवा करा; म्हणजे याहवेह तुम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून सोडवतील.” त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्या अष्टारोथ व बआलांच्या मूर्ती टाकून दिल्या आणि केवळ याहवेहची सेवा केली.

तेव्हा शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएली लोकांना मिस्पाह येथे जमा करा, म्हणजे मी याहवेहकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करेन.” जेव्हा ते मिस्पाह येथे एकत्र जमले, तेव्हा त्यांनी पाणी काढले व ते याहवेहसमोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास करून कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” त्यावेळी शमुवेल मिस्पाहमध्ये इस्राएलचा पुढारी1 म्हणून सेवा करीत होता.

इस्राएली लोक मिस्पाह येथे जमले आहेत, हे जेव्हा पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले. इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून वाचवावे म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी करावयाचे थांबवू नको.” मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेतले व त्याचा याहवेहला संपूर्ण होमार्पण म्हणून यज्ञ करून, इस्राएलच्या वतीने याहवेहकडे विनंती केली आणि याहवेहने ती ऐकली.

शमुवेल होमार्पण करत असताना, पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी युद्ध करावयाला जवळ आले. तेव्हा याहवेहने प्रचंड गडगडाटाने गर्जना करून पलिष्ट्यांना असे भयभीत केले की, इस्राएली लोकांपुढे त्यांचा बीमोड झाला. तेव्हा इस्राएली लोक मिस्पाहातून पलिष्ट्यांचा पाठलाग करीत बाहेर आले आणि बेथ-कार पर्यंत त्यांना जिवे मारीत गेले.

नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर2 असे नाव दिले.

अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता. एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती.

शमुवेल आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसांत इस्राएलचा शास्ता होऊन न्याय करीत होता. प्रतिवर्षी तो बेथेल, गिलगाल, मिस्पाह येथे अनुक्रमाने इस्राएलचा न्याय करीत फिरत असे. पण तो रामाह येथे, जिथे तो राहत होता तिथे परत जात असे आणि तिथेही तो इस्राएलचा न्याय करीत असे. आणि त्याने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली होती.

Source notes (2)
  1. Footnote किंवा न्यायाधीश
  2. Footnote एबेन-एजर म्हणजे साहाय्याचा दगड

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.