Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 92
एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित.
याहवेहची स्तुती गाणे,
आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.
प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची,
आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,
दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे,
आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.
हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता;
तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.
हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत!
तुमचे विचार किती गहन आहेत!
मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही;
मूर्खांना हे समजत नाही की,
दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात
व त्यांची भरभराट होते,
तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.
परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!
हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा,
निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल,
आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.
परंतु तुम्ही माझे शिंग1 रानबैलासारखे उंच केले आहे;
नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.
माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला;
माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.
नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील,
ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;
जे याहवेहच्या घरात रोपलेले,
आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.
वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील,
आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.
ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत;
ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”
Source notes (1)
- Footnote शिंग सामर्थ्याचे चिन्ह
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.