Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

1 थेस्सलनीकाकरांस 5

प्रभूचा दिवस

आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल. “शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.

परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल. परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात. आम्ही रात्रीचे किंवा अंधकाराचे नाही. आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे. क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे. ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे. म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.

अंतिम बोध

बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा. त्यांच्या कार्यामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्या, एकमेकांबरोबर शांतीने राहा. बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबुड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा. कोणी वाईटाची फेड वाईटाने करणार नाही याची काळजी घ्या, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.

सर्वदा आनंदित राहा, निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.

पवित्र आत्म्याला विझवू नका. संदेशाला तुच्छ मानू नका. परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा, सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.

परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत. ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत आणि ते करतीलच.

बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.

परमेश्वराच्या सर्व लोकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा.

हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभूसमोर आज्ञा करतो.

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.