Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
1 थेस्सलनीकाकरांस 4
परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जगणे
प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतर गोष्टीसंबंधाने आम्ही तुम्हाला आज्ञा केली होती की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कसे जीवन जगावे आणि ते तुम्ही जगतच आहात आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो व प्रभू येशूंमध्ये विनंती करतो की तुम्ही अधिकाधिक वाढ करावी. आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत.
परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे. आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेऊन तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे.1 जे परमेश्वराला ओळखत नाहीत अशा गैरयहूदीयांप्रमाणे कामवासनेच्या लालसेने नव्हे; आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्यांना प्रभू शिक्षा देतील. कारण परमेश्वराने आपल्याला अपवित्रतेसाठी नव्हे, तर पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे. यास्तव, जो कोणी या निर्देशाचा तिरस्कार करतो, तो मनुष्यांचा नव्हे परंतु ज्या परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे त्या परमेश्वराचा तिरस्कार करतात.
एकमेकांवर प्रीती करण्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी हे स्वतःच तुम्ही परमेश्वरापासून शिकला आहात. आणि वास्तविक, मासेदोनिया प्रांतातील परमेश्वराच्या सर्व कुटुंबावर तुम्ही प्रीती करीत आहात. तरी बंधू आणि भगिनींनो आम्ही विनंती करतो, ती अधिकाधिक करावी. शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या, म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
मरण पावलेले विश्वासणारे
बंधू आणि भगिनींनो, जे मरणामध्ये झोपी गेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर मनुष्यासारखा आपण खेद करू नये. कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो. स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही. कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील. त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू. या वचनांद्वारे परस्परांना प्रोत्साहन द्या.
Source notes (1)
- Footnote किंवा आपल्या स्वतःच्या पत्नीसोबत राहण्यास शिका
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.