Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

सफन्याह 3

यरुशलेम

हे जुलमी लोकांच्या नगरी,

विद्रोही व भ्रष्ट नगरी, तुला धिक्कार असो!

ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही,

ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही.

ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही,

ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही.

तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी

गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत;

तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत

ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.

तिचे संदेष्टे अधर्म करणारे आहेत;

ते विश्वासघातकी लोक आहेत.

तिचे याजक मंदिर अपवित्र करतात

ते आज्ञेचे उल्लंघन करतात.

परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत;

ते काहीही अयोग्य करीत नाहीत.

प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात,

आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत,

तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.

यरुशलेम पश्चात्ताप करणे नाकारते

“मी अनेक राष्ट्रांचा नाश केला;

त्यांच्या गडांना उद्ध्वस्त केले आहे.

मी त्यांचे रस्ते ओसाड केले आहेत

तिथून कोणीही प्रवास करीत नाही.

आणि त्यांची शहरे निर्जन केली आहेत;

ते त्यागलेले व रिकामे झाले आहेत.

यरुशलेमबद्दल मी विचार केला,

‘निश्चितच तू माझे भय धरशील;

आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’

तेव्हा तिचे आश्रयस्थान1 उद्ध्वस्त होणार नाही.

माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत,

पण तरीही पूर्वीसारखीच

भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.”

याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा,

त्या दिवशी मी दोषारोप करण्यास2 उभा राहीन.

पृथ्वीवरील सर्व राज्ये व राष्ट्रे

एकत्र करण्याचा मी निर्धार केला आहे

आणि त्यांच्यावर माझ्या कोपाचा वर्षाव करेन;

माझ्या अत्यंत तीव्र क्रोधाग्नीने

आणि माझ्या ईर्षेच्या अग्नीने

संपूर्ण विश्व जळून भस्म होईल.

इस्राएलच्या अवशेषाचे पुनर्स्थापन

“मग मी त्यांच्या ओठांचे शुद्धीकरण करेन,

असे की ते सर्व याहवेहच्या नामाचा धावा करतील

आणि खांद्याला खांदा लावून त्यांची सेवा करतील.

कूश देशाच्या नद्यांपलीकडून

माझे उपासक, माझे विखुरलेले लोक

माझ्यासाठी अर्पणे आणतील.

त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस,

त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही,

तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस.

कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन.

माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही

गर्विष्ठपणा केला जाणार नाही.

मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन,

असेच अवशिष्ट लोक ठेवेन.

इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते

याहवेहच्या नामात आश्रय घेतील.

इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत;

ते असत्य बोलणार नाहीत.

लबाडी करणारी जीभ

त्यांच्या मुखात असणार नाही.

ते अन्न सेवन करून विसावा घेतील

आणि त्यांना कोणीही भीती दाखविणार नाही.”

हे सीयोनकन्ये, तू गीत गा;

हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर!

अगे यरुशलेमकन्ये,

अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर.

कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे,

तुझ्या शत्रूचे सैन्य परत गेले आहे.

याहवेह, इस्राएलचे राजा तुझ्यासह आहेत;

यापुढे हानीचे भय तू बाळगणार नाही.

त्या दिवशी

ते यरुशलेमला असे म्हणतील,

“हे सीयोना, भिऊ नकोस,

तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.

महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत,

ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत.

त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो;

तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत.

त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.”

“जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत,

ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात,

त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन.

त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन.

त्या सर्वांचा मी जाब घेईन.

जे लंगडे आहेत त्यांची मी सोडवणूक करेन;

बंदिवासात गेलेल्यांना मी एकत्र करेन.

जिथे ते लज्जित झाले त्या प्रत्येक भूमीवर

त्यांना मी प्रशंसा व गौरव बहाल करेन.

त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन;

त्यावेळी मी तुम्हाला घरी परत आणेन.

जेव्हा मी तुमची संपन्नता तुम्हाला परत देईन

तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये,

स्वतःच्या दृष्टीसमोर

मी तुम्हाला गौरव व प्रशंसा बहाल करेन,”

असे याहवेह म्हणतात.

Source notes (2)
  1. Footnote किंवा तिचे पवित्रस्थान
  2. Footnote किंवा लूट घेण्यास

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.