Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

लूक 15

हरवलेल्या मेंढराचा दाखला

आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”

त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला: “समजा, एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय? ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.

हरवलेल्या नाण्याचा दाखला

“एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी1 असून त्यातील एक हरवले, तर ती दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय? ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”

हरवलेल्या पुत्राचा दाखला

येशू पुढे म्हणाले, “एका मनुष्याला दोन पुत्र होते. त्यातील धाकटा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतील माझा वाटा मला द्या’ त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली मालमत्ता त्यांच्यामध्ये वाटून दिली.

“काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला, तिथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला. सर्वकाही खर्च करून झाल्यानंतर, त्या संपूर्ण देशामध्ये कडक दुष्काळ पडला आणि त्याला प्रत्येक वस्तूची उणीव भासू लागली. तेव्हा तो स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते.

“शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे. मी आता माझ्या पित्याकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’ तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला.

“तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.

“मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’

“परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला. खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू. कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला.

“तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले. तेव्हा त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ यावर त्याला सांगण्यात आले, ‘तुझा भाऊ परत आला आहे. तो सुखरुपपणे घरी आला म्हणून तुमच्या वडिलांनी एक पोसलेले वासरू कापले आहे!’

“हे ऐकताच थोरला भाऊ खूप रागावला. तो घरात जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनंती करू लागले. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘बाबा, मी इतकी वर्षे सेवा केली आणि तुमची एकही आज्ञा मोडली नाही, तरी तुम्ही आजपर्यंत मी माझ्या मित्रांबरोबर आनंद करावा म्हणून एक करडूही दिले नाही. पण आता हा तुमचा पुत्र आपली सर्व संपत्ती वेश्यांवर उधळून घरी आला, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापले आहे!’

“यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू माझ्याबरोबर नेहमीच असतोस आणि जे माझे आहे, ते सर्व तुझेच आहे. हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”

Source notes (1)
  1. Footnote ग्रीक दहा नाणी द्राह्मा एका व्यक्तीची एक दिवसाची मजुरी

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.