Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यहेज्केल 5

परमेश्वराच्या न्यायाचा वस्तरा

“आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्‍या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर. जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्‍यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन. परंतु त्यातील काही केस घेऊन ते आपल्या कपड्यात खोचून ठेव. पुन्हा त्यातून काही केस घे व ते अग्नीत जाळून टाक. तिथूनच सर्व इस्राएलमध्ये अग्नी पसरेल.

“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली. तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही.

“यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.

“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन. जे मी पूर्वी कधी केले नाही किंवा पुन्हा करणार नाही असे तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे तुला करेन. म्हणून तुझ्यामधील आईवडील आपल्या लेकरांना खातील व लेकरे त्यांच्या आईवडिलांना खातील. मी तुमच्यावर न्यायशासन आणेन आणि बाकीच्यांना वार्‍यावर पसरवून टाकीन. म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही. तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्‍या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्‍यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन.

“तेव्हा माझा राग शांत होईल आणि त्यांच्याविषयी असलेला क्रोध कमी होईल आणि माझा सूड पूर्ण होईल. जेव्हा त्यांच्यावरील माझा क्रोध संपेल, तेव्हा ते जाणतील की मी याहवेह आपल्या ईर्षेने बोललो आहे.

“तुझ्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये आणि जे तुझ्याजवळून जातील त्यांच्या समक्ष मी तुझा नाश व तुला निंदा असे करेन. जेव्हा मी माझा राग व क्रोधाच्या फटक्याने व निषेधाच्या आरोपाने तुला शासन करेन, तेव्हा तू तुझ्या सभोवतालच्या राष्ट्रांना निंदा व टोमणा, चेतावणी व भयाचा विषय होशील. मी याहवेह हे बोललो आहे. जेव्हा मी तुझ्यावर दुष्काळाच्या घातक व नाशवंत बाणांनी वार करेन, ते मी तुझा नाश करण्यासाठी करेन. मी तुझ्यावर अधिक आणि अधिक दुष्काळ आणेन व तुझा अन्नपुरवठा संपुष्टात आणेन. मी तुझ्याविरुद्ध दुष्काळ आणि जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुला अपत्यहीन करतील. मरी व रक्तपात तुमच्यात असतील, आणि तुझ्याविरुद्ध मी तलवार आणेन. मी याहवेह हे बोललो आहे.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.