Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यहेज्केल 34

याहवेह इस्राएलचे मेंढपाळ होतील

याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय? तुम्ही दही खाता, उत्तम मेंढरे कापून तुम्ही आपल्यावर लोकर पांघरता, परंतु तुम्ही आपल्या कळपाची काळजी घेत नाही. तुम्ही अशक्तांस सशक्त केले नाही, ना रोग्याला आरोग्य दिले ना जखमेला पट्टी केली. भटकलेल्यास तुम्ही परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधून आणले नाही. तुम्ही त्यांच्यावर कठोर व क्रूरतेने राज्य केले. म्हणून मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची पांगापांग झाली आणि जेव्हा ते पांगले गेले तेव्हा हिंस्र पशूंसाठी भक्ष्य झाले. माझी मेंढरे सर्व डोंगरांवर व प्रत्येक उंच पर्वतांवर भटकली. संपूर्ण पृथ्वीभर ते पसरले आणि कोणी त्यांचा शोध केला नाही किंवा त्यांची नोंद घेतली नाही.

“ ‘म्हणून, तुम्ही मेंढपाळांनो, याहवेहचे वचन ऐका: सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जीविताची शपथ, माझ्या कळपाला मेंढपाळ नाही आणि म्हणून त्यांची लूट झाली व हिंस्र श्वापदासाठी भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपाचा शोध केला नाही आणि कळपाची काळजी न घेता स्वतःचीच काळजी घेतली, म्हणून मेंढपाळांनो, तुम्ही याहवेहचे वचन ऐका: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी मेंढपाळांविरुद्ध आहे आणि माझ्या कळपाचा जाब त्यांच्यापासून घेईन. माझा कळप राखण्याचे काम मी त्यांच्यापासून काढून घेईन, म्हणजे मेंढपाळ पुन्हा स्वतःस पोसणार नाही. त्यांच्या तोंडातून मी माझ्या कळपाची सुटका करेन आणि यापुढे ते त्यांचा आहार होणार नाही.

“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी स्वतः माझ्या मेंढरांचा शोध करेन आणि त्यांची काळजी घेईन. मेंढपाळ जेव्हा आपल्या मेंढरांमध्ये राहून पांगलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तसेच मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. ढगाळ व अंधकाराच्या दिवसात ते पांगून गेले त्या सर्व ठिकाणातून मी त्यांना सोडवेन. राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन. मी त्यांना उत्तम कुरणात पाळीन आणि इस्राएलच्या डोंगरांचे माथे त्यांची चरण्याची ठिकाणे होतील. तिथे ते चांगल्या कुरणात बसतील आणि तिथे इस्राएलच्या डोंगरांवर सर्वोत्तम कुरणात चरतील. मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. जे हरवले आहेत त्यांचा शोध मी करेन आणि भटकून गेलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्यांची पट्टी करेन आणि दुबळ्यांना शक्ती देईन, परंतु पुष्ट व बलवानांना मी नष्ट करेन. मी कळपाला न्यायाने पाळीन.

“ ‘हे माझ्या कळपा, तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एक मेंढरू व दुसरे मेंढरू आणि एडके व बोकडे यामध्ये मी न्याय करेन. चांगला चारा तुम्हाला खायला मिळाला ते तुम्हाला पुरेसे नाही काय? तुमचे बाकीचे कुरण तुम्ही तुमच्या पायाखाली तुडवावे काय? तुम्हाला पिण्यास स्वच्छ पाणी मिळाले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? बाकीचे पाणी तुम्ही तुमच्या पायांनी गढूळ करावे काय? तुम्ही जे तुमच्या पायाखाली तुडविले ते माझ्या कळपाने खावे काय आणि जे तुमच्या पायांनी तुम्ही गढूळ केले ते पाणी त्यांनी प्यावे काय?

“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह त्यांना म्हणतात: मी स्वतः पुष्ट मेंढरे आणि दुबळी मेंढरे यांच्यात न्याय करेन. अशक्त मेंढरांना तुम्ही तुमच्या बाजूंनी व खांद्यांनी धक्के दिले आणि त्यांना तुमच्या शिंगांनी ढकलत बाहेर हाकलून दिले, म्हणून मी माझ्या कळपाला वाचवेन आणि त्यांची यापुढे लूट होणार नाही. मी एक मेंढरू व दुसऱ्या मेंढरांमध्ये न्याय करेन. मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल. मी याहवेह त्यांचा परमेश्वर होईन आणि माझा सेवक दावीद त्यांच्यात राजपुत्र असेल. मी याहवेह हे बोललो आहे.

“ ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील. मी त्यांना आणि माझ्या डोंगराभोवती असलेल्या ठिकाणांना आशीर्वाद असे करेन.1 मी नेमलेल्या ऋतूत पाऊस पाडेन; आशीर्वादाची वृष्टी असेल. झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. ते यापुढे राष्ट्रांची लूट होणार नाहीत व हिंस्र पशू त्यांना फाडून खाणार नाहीत. ते सुरक्षिततेत राहतील आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही. आपल्या पिकासाठी प्रसिद्ध असणारा देश मी त्यांना देईन आणि यापुढे ते देशात दुष्काळाने पीडित होणार नाहीत किंवा राष्ट्रांची थट्टा त्यांना सोसावी लागणार नाही. तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि ते इस्राएली माझे लोक आहेत, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तुम्ही माझी मेंढरे आहात, तुम्ही मानव माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि मी तुमचा परमेश्वर आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

Source notes (1)
  1. Footnote किंवा ते व माझ्या डोंगराभोवती असलेले आशीर्वाद असे दिसावे असे मी करेन.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.