Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यहेज्केल 24

यरुशलेम एका कढईप्रमाणे

नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “हे मानवपुत्रा, ही तारीख, हा दिवस नोंदून ठेव, कारण आजच्याच दिवशी बाबेलच्या राजाने यरुशलेमला वेढा घातला. या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:

“ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव

आणि त्यात पाणी ओत.

त्यात मांसाचे तुकडे टाक,

सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा.

यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;

कळपातील उत्तम मेंढरू निवडून घे.

हाडांसाठी कढईच्या खाली लाकडे ठेव;

आणि ते उकळून

त्यात हाडे शिजव.

“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात:

“ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो,

ज्या कढईला गंज लागला आहे,

ज्याचा थर जाणार नाही!

जसे काढता येईल

तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या.

“ ‘कारण तिने सांडलेले रक्त तिच्यामध्येच आहे:

ते तिने उघड्या खडकावर ओतले;

तिने ते मातीने झाकले जाईल असे,

जमिनीवर ओतले नाही.

कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून

मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन,

म्हणजे ते झाकले जाणार नाही.

“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात:

“ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो!

मी देखील लाकडाचा ढीग उंच करेन.

तर लाकडाचा ढीग करा

आणि अग्नी पेटवा.

मसाले मिसळून;

मास चांगले शिजवून घ्या,

हाडे पूर्णपणे जळू द्या.

मग रिकामी कढई निखार्‍यावर ठेवा

ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या,

म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल

आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल.

परंतु सर्व प्रयत्न वाया गेले;

तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही,

तो अग्नीने देखील निघाला नाही.

“ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.

“ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

यहेज्केलच्या पत्नीचा मृत्यू

याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस. शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”

म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्‍या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले.

तेव्हा लोकांनी मला विचारले, “या सर्व गोष्टींचे आमच्याशी काय देणे घेणे आहे? तू असे का वागत आहेस?”

तेव्हा मी त्यांना म्हटले, “याहवेहचे वचन माझ्याकडे आले: इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील. आणि जसे मी केले तसेच तुम्हीही कराल. तुम्ही आपली मिशी आणि दाढी झाकणार नाही किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तुम्ही खाणार नाही. तुम्ही आपले पागोटे आपल्या डोक्यावर आणि तुमची पायतणे तुमच्या पायात असू द्यावीत. तुम्ही शोक करू नये किंवा रडू नये, तर तुमच्या पापांमुळे तुम्ही झुराल व आपसातच कण्हाल. यहेज्केल तुमच्यासाठी एक चिन्ह असा आहे; जसे त्याने केले तसेच तुम्हीही करा. हे जेव्हा घडेल, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.’

“आणि तू, हे मानवपुत्रा, ज्या दिवशी मी त्यांचे बलवान दुर्ग, त्यांचा हर्ष आणि गौरव, त्यांच्या डोळ्यांचा आनंद, त्याच्या हृदयाची इच्छा आणि त्यांची मुले व मुली सुद्धा काढून घेईन; त्या दिवशी एक फरार झालेला तुम्हाला वर्तमान सांगण्यास येईल. त्यावेळी तुझे तोंड उघडेल; तू त्याच्याशी बोलशील, आणखी शांत बसणार नाही. याप्रकारे तू त्यांच्यासाठी एक चिन्ह असा असशील, आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.