Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
दानीएल 12
शेवटचा काळ
“त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल. पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. जे सुज्ञ आहेत1 ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्यांप्रमाणे चकाकतील. पण हे दानीएला, गुंडाळीतील ही वचने गुप्त ठेव आणि गुंडाळी शेवटच्या काळासाठी मोहोरबंद करून ठेव. पुष्कळजण इकडून तिकडे फिरतील आणि ज्ञान वाढत जाईल.”
तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले. त्यांच्यातील एकाने तागाची वस्त्रे नेसलेल्या व आता नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाला विचारले, “आधी सांगितलेल्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती काळ लागेल?”
तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय.2 शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?”
त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे. पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल.
“रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील. धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील.
“आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.”
Source notes (2)
- Footnote किंवा जे ज्ञान वाटतात
- Footnote किंवा एक वर्ष, दोन वर्षे आणि अर्धे वर्ष
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.