Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

1 करिंथकरांस 15

ख्रिस्ताचे पुनरुत्थान

आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात. या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे.

प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले. त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले, आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना. त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत. याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले. सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.

कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला. आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले. प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.

मृतांचे पुनरुत्थान

परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही. आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही. जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही; आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाले नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुम्ही अजूनही तुमच्या पापातच आहात. आणि तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.

परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे. कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील. नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील. कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल. कारण त्यांनी “सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या आहेत.”1 आता जेव्हा असे म्हटले आहे की, “सर्वकाही” त्यांच्या अधिकाराखाली ठेवले आहे, यावरून स्पष्ट होते की ज्यांनी “सर्वकाही” ख्रिस्ताच्या अधीन केले आहे आणि त्या सर्वकाहीमध्ये परमेश्वराचा समावेश नाही. हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे.

जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे? आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे? निश्चित, मी दररोज मृत्यूला तोंड देतो. मला ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. जर पृथ्वीवरील आशेने इफिस येथील हिंस्र पशूंशी मनुष्यांसारखे लढण्यात आले तर मला काय लाभ झाला? जर मेलेले पुन्हा जिवंत होणार नाही तर,

“चला, आपण खाऊ आणि पिऊ,

कारण उद्या आपण मरणार आहोत.”2

तुम्ही फसविले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.”3 तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.

पुनरुत्थित शरीर

आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?” किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही. तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्‍या कशाचे तरी असते. मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात. सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्‍या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक. त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्‍या प्रकारचे आहे. सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्‍या प्रकारचे आणि तार्‍यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्‍यांचेही तेज वेगवेगळे असते.

अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते. अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते. नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते.

जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे. असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.”4 शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे. प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे. पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता. जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत. आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.

माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही. ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ. कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे. जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”5

“अरे मरणा, तुझा विजय कुठे?

अरे मरणा, तुझी नांगी कुठे?”6

कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.

यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.

Source notes (6)
  1. Footnote स्तोत्र 8:6
  2. Footnote यश 22:23
  3. Footnote मिनांदर नावाच्या ग्रीक कवी पासून
  4. Footnote उत्प 2:7
  5. Footnote यश 25:8
  6. Footnote होशे 13:14

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.