इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 20
विजयासाठी प्रार्थना
मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र.
परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो,
याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो,
आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो,
आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू.
आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू.
परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे.
त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने,
तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.
काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर,
परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
ते खाली आणले गेले आणि पडले,
परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!
हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.