इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 137
बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत
आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो;
आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
तेथील वाळुंजावर
आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले
आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले,
सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
परक्या देशात
आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो,
तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
जर मी तुला विसरलो,
जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य
विषयाहून अधिक मानले नाही
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या
त्या दिवसाची आठवण कर,
ते म्हणाले, ती पाडून टाका,
पायापर्यंत पाडून टाका.
हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस,
कारण जसे तू आम्हास केले तसे,
जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो
तो आशीर्वादित होईल.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.