Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 118

परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती

परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे,

कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

इस्राएलाने आता म्हणावे,

“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

अहरोनाच्या घराण्याने म्हणावे,

“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे,

“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली.

परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.

परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही;

मनुष्य माझे काय करू शकेल?

माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे;

माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.

मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा

परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.

मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा

परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.

सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे;

परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.

त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे.

परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.

त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे;

जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील.

परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.

मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला,

परंतु परमेश्वराने मला मदत केली.

परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे.

आणि तो माझे तारण झाला आहे.

उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे;

परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.

परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे;

परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.

मी मरणार नाही, पण जगेन

आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.

परमेश्वराने मला जबर शिक्षा केली;

परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.

माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा;

मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.

हे परमेश्वराचे दार आहे;

नितीमान त्यातून प्रवेश करतील.

मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे

आणि तू माझे तारण झाला आहेस.

इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता,

तोच कोनाशिला झाला आहे.

परमेश्वराने हे केले आहे;

आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.

परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे;

ह्यात आपण आनंद व उल्लास करू.

हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर;

हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.

परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो;

परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.

परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे;

यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.

तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन.

तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.

अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे;

कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.