इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 101
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा
दाविदाचे स्तोत्र
मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन;
हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन.
अहा, तू माझ्याकडे कधी येशील?
मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही;
अनाचाराचा मी द्वेष करतो;
तो मला बिलगणार नाही.
हेकेखोर लोक मला सोडतील;
मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन.
जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील;
जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत;
लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन;
वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.