Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

उत्प 17

सुंता ही कराराची खूण

निर्ग. 12:43-13:2

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा. तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.” मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला, “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील. येथून पुढे तुझे नाव अब्राम 1असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे. मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन. ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.” नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा. माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी. पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो. अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील. ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.” देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल. मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.” अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?” अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.” देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला. त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली. अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली. त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.

Source notes (1)
  1. Footnote अर्थ-थोर पूर्वज

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.