इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
उत्प 16
हागार आणि इश्माएल
अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले. अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली. त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली. नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली. शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.” परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.” परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल1 म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील2, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.” नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस3,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?” तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई4 असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.
Source notes (4)
- Footnote अर्थ-देव ऐकतो
- Footnote तो पूर्वेस वस्ती करेल
- Footnote एल-रोही
- Footnote ऐकणाऱ्या जिवंत देवाची विहीर
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.