Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

अनु 15

ऋणविमोचनाचे वर्ष

निर्ग. 21:1-11; लेवी. 25:1-7

प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे. त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्यास परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे. तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या. कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल. तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल. गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.

दासांशी ठेवायची वर्तणूक

एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा. पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका. तर तुझी गुरे, खळे, द्राक्षकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्यास दे. आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे. असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही. तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा. दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल.

प्रथमजन्मलेल्यांचे समर्पण

तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका. दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा. पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका. वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.