Indian Revised Version(IRV) Marathi - 2019
स्तोत्र 146
परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती
परमेश्वराची स्तुती करा.
हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन.
मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही,
अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो;
त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.
ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे,
ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले,
तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो,
आणि तो भुकेल्यांना अन्न देतो.
परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.
परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो;
परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो.
परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो.
तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो.
परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो,
हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो.
परमेश्वराची स्तुती करा.
Indian Revised Version(IRV) Marathi - 2019. Copyright © Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.