Skip to content
BibleKenya

Indian Revised Version(IRV) Marathi - 2019

गण 33

इस्त्राएल लोकांच्या प्रवासातील टप्पे

मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.

पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.

इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले. ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले. त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.

मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला. लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती. लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले.

त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला. सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला. लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले. लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.

लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला. त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला. किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले. हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला.

रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले. रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला. लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला. रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला. लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले. शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले. लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला. मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.

लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले. तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला. लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला. हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.

त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला. बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले. होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले. याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.

अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला. लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला. लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.

याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.

कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले. लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला. त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले. पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.

लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले. लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले.

अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला. लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.

कनानाच्या चतु: सीमा त्यांची वाटणी

आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल. तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.

तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे. तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.

परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील. मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.

Indian Revised Version(IRV) Marathi - 2019. Copyright © Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.