Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

जखर्‍याह 9

इस्राएलच्या शत्रूवर दंडाज्ञा

ही एक भविष्यवाणी आहे:

हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले,

आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल;

कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी

याहवेहवर लागलेली आहे;1

सोर व सीदोनवर,

आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.

सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत;

तिने रुपे धुळीच्या

व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.

परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील

आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील,

आणि ती अग्नीत भस्म होईल.

अष्कलोन हे पाहून भयभीत होईल;

गाझा वेदनेने कळवळेल,

व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल.

गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल

आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल.

मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील,

आणि मी पलिष्ट्यांच्या गर्वाचा अंत करेन.

मी त्यांच्या मुखातून रक्त व

त्यांच्या दातांमधून अमंगळ अन्न बाहेर काढेन.

जे अवशिष्ट लोक राहतील ते आपल्या परमेश्वराचे होतील

आणि यहूदीयाच्या कुळात समाविष्ट करण्यात येतील

पलिष्टी आणि एक्रोनचे पूर्वी जसे होते तसे हे लोक यबूसी लोकांप्रमाणे होतील.

परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी

मी माझ्या मंदिराभोवती ठाण मांडेन.

यापुढे माझ्या लोकांवर कोणीही जुलूम करणारे अधिकार गाजविणार नाहीत,

आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन.

सीयोनच्या राजाचे आगमन

सीयोनकन्ये, फार आनंद कर!

यरुशलेमकन्ये, गर्जना कर!

पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे,

तो नीतिमान व विजयी आहे,

तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे

होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!

मी एफ्राईमचे रथ

आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन,

आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील.

आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल.

त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्‍या समुद्रापर्यंत

आणि फरात2 नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.

तुमच्या बाबत बोलायचे तर,

रक्ताने शिक्कामोर्तब करून तुमच्याशी केलेल्या करारामुळे,

मी तुमच्या बंदिवानांना निर्जल गर्तेतील मृत्यूपासून सोडविणार आहे.

अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या;

आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन.

यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो

आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन.

अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना

हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन,

आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.

याहवेहचे दर्शन होईल

मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील;

त्यांचे बाण विजेसारखे चमकतील.

सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील;

ते दक्षिणेतील वादळातून चालतील,

आणि सर्वसमर्थ याहवेह त्यांचे रक्षण करतील.

ते नष्ट करतील,

आणि गोफणीच्या दगडांनी विजयी होतील.

ते प्राशन करतील व मद्यपीसारखे गर्जना करतील;

ते वाटीसारखे ओतप्रोत भरतील आणि

वेदीच्या कोपऱ्यांवर शिंपडण्यासाठी उपयोगात येतील.

त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो,

त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील.

मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे

ते त्यांच्या देशात चमकतील.

ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील!

धान्य तरुणांची

आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल.

Source notes (2)
  1. Footnote किंवा याहवेहची नजर इस्राएलच्या सर्व कुळांवर आहे
  2. Footnote फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.