Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

जखर्‍याह 14

याहवेह येतात आणि राज्य करतात

याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल.

मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील. मग याहवेह बाहेर पडून लढाईच्या दिवशी करतात तसे, त्या राष्ट्रांशी युद्ध करतील. त्या दिवशी त्यांचे पाय यरुशलेमच्या पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या पर्वतावर उभे राहतील आणि जैतूनांचा पर्वत पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे निर्माण होईल, अर्धा पर्वत उत्तरेकडे व अर्धा पर्वत दक्षिणेकडे सरेल. तुम्ही माझ्या खोर्‍यातून पळ काढाल, कारण ते खोरे आझल नगरीच्या वेशीपर्यंत भिडेल. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी तुमचे लोक, यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या काळात भूकंप1 झाला होता तेव्हा निसटून गेले होते, त्याचप्रमाणे तुम्हीही निसटून जाल आणि मग याहवेह, माझे परमेश्वर येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व पवित्रजनही येतील.

त्या दिवशी सूर्यप्रकाश नसेल व थंड, धुक्याचा अंधकारही नसेल. तो एक अद्वितीय दिवस असेल—फक्त याहवेहलाच माहीत असलेला तो दिवस असेल—दिवस व रात्रीत फरक राहणार नाही. संध्याकाळ झाली, तरीही प्रकाश असेल.

त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील.

तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल.

यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील. तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल.

जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील. याहवेहकडून आलेल्या भयंकर भीतीने त्यांना धडकी भरेल. त्यांची त्रेधा उडून ते एकमेकांवर हल्ला करतील. यहूदीयाही यरुशलेमात लढेल. शेजारच्या सर्व राष्ट्रांची संपत्ती—सोने आणि रुपे व तलम कपडे यांचे मोठमोठे साठे जप्त केले जातील. अशीच मरी घोडे, खेचरे, उंट, गाढवे यावर आणि शत्रूच्या ठाण्यातील इतर सर्व प्राण्यांवर पसरेल.

मग ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केले त्या सर्व राष्ट्रातून वाचलेले अवशिष्ट लोक प्रत्येक वर्षी वर यरुशलेमला राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची भक्ती करण्यास, मंडपाचा सण पाळण्यास व आराधना करण्यास जातील. आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही. जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात. म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल.

त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्‍यांसारखी होतील. यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी2 नसतील.

Source notes (2)
  1. Footnote किंवा भूकंपामुळे होते त्याप्रमाणे पर्वताची खोरे अडविली जातील
  2. Footnote किंवा व्यापारी

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.