Biblica® Open Marathi Contemporary Version
रोमकरांस 14
विश्वासात दुर्बल असलेल्यांशी सहिष्णुता
विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका. कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु ज्याचा विश्वास दुर्बल तो शाकभाजीच खातो. जो कोणी सर्वकाही खातो त्याने न खाणार्याला तुच्छ ठरवू नये, आणि जो कोणी सर्वकाही खात नाही त्याने खाणार्याचा न्याय करू नये; कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे. दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
कोणी मनुष्य एखादा दिवस दुसर्या दिवसापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो; आणखी कोणी सर्व दिवस सारखेच मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाने पूर्ण खात्री करून घ्यावी. जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत. ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
तर तू आपल्या बंधूला व भगिनीला दोषी का ठरवितोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का मानतोस? आपणा सर्वांस परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहवयाचे आहे. कारण असे लिहिले आहे:
“ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’
‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल;
आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”1
तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूंमध्ये माझी खात्री आहे, की कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही; तरी अमुक पदार्थ अशुद्ध आहे, असे समजणार्यासाठीच तो अशुद्ध आहे. तुझ्या बंधूला किंवा भगिनीला अन्नामुळे क्लेश झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावले त्यांचा नाश तुझ्या खाण्यामुळे करू नको. तुमच्या दृष्टीने जे चांगले ते तुम्हाला माहीत आहे, त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रसंग आणू नका. परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे. कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.
तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा नाश करू नका. सर्व अन्न शुद्धच आहे; परंतु जो व्यक्ती काहीही खाण्यामुळे इतरांना अडखळवितो त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.
तुझ्याठायी जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य, पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
Source notes (1)
- Footnote यश 45:23
Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.