Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

स्तोत्रसंहिता 80

संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र.

इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका,

तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले.

करुबांच्या मध्ये विराजमान असलेले,

तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.

एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या;

या व आमचे तारण करा.

हे परमेश्वरा, आम्हाला पूर्वस्थितीत आणा;

आमचे तारण होण्यासाठी,

तुमचे मुख आमच्यावर प्रकाशित करा.

हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा,

तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध,

कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार?

तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला;

वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले.

तुम्ही आम्हाला शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केले आहे;

ते आपसात आमचा उपहास करतात.

हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा;

आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा,

म्हणजे आमचे तारण होईल.

तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली;

इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.

तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली;

या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली.

मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने

पर्वतदेखील झाकले गेले;

त्या फांद्या समुद्रापर्यंत1,

तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या.

तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले,

म्हणजे येणारे जाणारे सर्वजण त्याचे द्राक्ष तोडतील?

रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत,

आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत.

हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या!

स्वर्गातून खाली दृष्टी लावा!

या द्राक्षवेलीची काळजी घ्या.

तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या,

स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या2.

कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे;

तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात.

जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या,

स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या.

मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही;

आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.

हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा;

आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा,

तरच आमचे तारण होईल.

Source notes (2)
  1. Footnote किंवा भूमध्य समुद्रापर्यंत
  2. Footnote किंवा फांदी

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.