Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

स्तोत्रसंहिता 30

एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र

याहवेह मी तुमची प्रशंसा करेन,

कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे

आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.

हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली

आणि तुम्ही मला रोगमुक्त केले.

याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले;

तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले.

अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा,

त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.

त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो,

पण त्यांची कृपा जन्मभर राहते.

विलाप करणे केवळ रात्रभर राहील,

परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.

माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो,

“मी कधीही डगमगणार नाही.”

याहवेह, तुमच्या कृपेने

मला बळकट पर्वताप्रमाणे1 स्थिर केले होते,

परंतु तुम्ही आपले मुख लपविले,

तेव्हा मी भयभीत झालो.

याहवेह मी तुमचा धावा केला,

मी प्रभूला कृपेची विनवणी केली.

मी चिरनिद्रीत होण्यापासून

मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ?

माती तुमची स्तुती करेल काय?

ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय?

याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा;

याहवेह मला साहाय्य करा.

तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले.

तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,

जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे.

याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.

Source notes (1)
  1. Footnote म्हणजेच सीयोन पर्वत

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.