Biblica® Open Marathi Contemporary Version
स्तोत्रसंहिता 26
दावीदाचे स्तोत्र.
याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा,
मी दोषरहित जीवन जगलो;
याहवेह, मी न डगमगता
तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा,
माझे मन आणि हृदयाची पारख करा.
कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो
आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.
कपटी लोकांसोबत मी बसत नाही
किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.
दुष्कर्म करणार्यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात
आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.
मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन
आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,
म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन
आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.
याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते,
इथेच तुमचे वैभव वसती करते.
पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला,
आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.
त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत,
त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.
मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन;
मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.
माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत;
महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.
Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.