Biblica® Open Marathi Contemporary Version
स्तोत्रसंहिता 20
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको;
याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो
आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.
तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो
आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला1
तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो
आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.
तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू
आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू.
याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.
आता मला माहीत आहे:
याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात;
पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या
उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.
कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात,
परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
ती कोसळतील आणि नाश पावतील,
पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.
याहवेह, राजाला विजयी करा!
जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!
Source notes (1)
- Footnote सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.