Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

स्तोत्रसंहिता 101

दावीदाची रचना. एक स्तोत्र.

हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन;

मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे—

तुम्ही माझ्याकडे कधी येणार?

माझ्या घरातील माझा व्यवहार

मी निष्कलंक तर्‍हेने करेन.

मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे

नजर टाकणार नाही.

मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे.

त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.

कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील;

अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.

आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास,

मी नष्ट करेन;

दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा

सहवास मला असह्य वाटेल.

देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन,

जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील;

ज्यांचे आचरण दोषरहित असेल,

असेच लोक माझी सेवा करतील.

परंतु जे इतरांची फसवणूक करतात,

अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही,

आणि जे असत्य बोलतात,

ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.

दररोज सकाळी

मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन;

याहवेह देवाच्या या नगरीतील

प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.