Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

नीतिसूत्रे 7

व्यभिचारिणीपासून सावध राहणे

माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव,

आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव.

माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील;

तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर.

तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव;

तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव.

“तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला,

आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण.

म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील,

वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील.

माझ्या घराच्या खिडकीच्या

जाळीतून मी खाली पाहिले.

साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले,

तरुणांचे मी अवलोकन केले,

तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला.

तो तिच्या रस्त्याच्या कोपर्‍याजवळून जात होता,

सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता.

दिवसाच्या संधिप्रकाशात,

संध्याकाळच्या अंधारात होता.

तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली,

तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.

(ती बेशिस्त आणि उर्मट आहे,

तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;

आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे

प्रत्येक कोपर्‍यावर ती लपून बसते.)

तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले,

आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:

आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत,

आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.

म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले;

मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!

मी माझा पलंग इजिप्त येथील

सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.

ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी

मी माझी शय्या सुवासिक केली आहे.

चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ;

आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!

कारण माझे पती घरी नाहीत;

ते दूर प्रवासाला गेले आहेत;

त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे,

आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.

तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले;

गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.

जसा बैल कापणार्‍याकडे जातो,

तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला,

हरिण1 जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो,

ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो,

त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.

तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका,

मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या.

तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका

किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.

कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे;

होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.

तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग,

आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे.

Source notes (1)
  1. Footnote किंवा मूर्ख

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.