Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

गणना 36

सलाफहादच्या कन्यांचे वतन

योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले. ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे. परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल. आणि जेव्हा इस्राएल लोकांचे योबेल वर्ष येईल, तेव्हा त्यांचे वतन ज्या गोत्रात ते लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल आणि त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या गोत्रातून काढून घेतले जाईल.”

नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा. इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे. इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल. कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”

याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले. सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला. त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले.

मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.