Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

लेवीय 24

जैतून तेल आणि भाकर याहवेहपुढे ठेवणे

याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा. याहवेहसमोर असलेल्या शुद्ध सोन्याच्या दीपस्तंभावरील दिव्यांची नियमितपणे व्यवस्था करावी.

“सपीठ घ्यावे आणि त्याच्या बारा भाकरी तयार कराव्या, प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा1 वापरावा. त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी. ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे. या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्‍या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.”

ईशनिंदा करणार्‍याला मृत्युदंड

एकदा एका इस्राएली स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्तचे होते, इस्राएली छावणीत गेला. तिथे छावणीत त्याचे आणि एका इस्राएली मनुष्याचे भांडण झाले. इस्राएली स्त्रीच्या मुलाने परमेश्वराच्या नावाची निंदा केली आणि तो शिव्याशाप देऊ लागला; तेव्हा त्याला मोशेकडे आणले. (त्याच्या आईचे नाव शेलोमीथ होते, ती दान वंशातील दिब्रीची कन्या होती.) तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

मग याहवेहनी मोशेला सांगितले: “परमेश्वराच्या नावाची निंदा करणार्‍याला छावणीच्या बाहेर घेऊन जा. ज्यांनी हे बोलताना ऐकले आहे, त्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी; याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.

“ ‘जो कोणी एखाद्या मनुष्याचा जीव घेईल त्याला निश्चित जिवे मारावे. जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन. जो कोणी आपल्या शेजार्‍याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे: हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे. जो कोणी प्राण्याची हत्या करतो, त्याने निश्चित त्याची परतफेड करावी, परंतु जो कोणी मनुष्याची हत्या करतो त्याला जिवे मारावे. परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्‍याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.

Source notes (1)
  1. Footnote अंदाजे 3.2 कि.ग्रॅ.

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.