Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

शास्ते 20

इस्राएली बिन्यामीन गोत्रांना शिक्षा देतात

तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले. इस्राएलाच्या सर्व गोत्रप्रमुखांनी परमेश्वराच्या लोकांच्या सभेत आपले स्थान घेतले, जे तलवारीने सज्ज असलेले चार लाख लोक होते. (बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएली लोक वर मिस्पाह येथे गेले आहेत.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”

तेव्हा तो लेवी, ज्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती तिचा पती म्हणाला, “मी आणि माझी उपपत्नी बिन्यामीनच्या गिबियाह येथे रात्र घालविण्यास आलो. रात्रीच्या वेळेस गिबियाहतील लोक माझ्यामागे आले आणि घरास वेढा घातला व माझा घात करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली. तेव्हा मी उपपत्नीला घेतले आणि तिच्या शरीराचे कापून बारा तुकडे केले व ते इस्राएलांच्या वारसांच्या सर्व प्रांतात पाठवून दिले, कारण इस्राएलात त्यांनी हे अपवित्र आणि घृणास्पद कृत्य केले. तर आता इस्राएलांच्या सर्व लोकांनो, बोला आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला ते मला सांगा.”

सर्व पुरुष एकत्र उठून एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही घरी परतणार नाही. नाही, आपल्यापैकी कोणीही त्याच्या घरी परतणार नाही. पण आता आम्ही हे गिबियाहविषयी करणार: आपण चिठ्ठ्या टाकून त्याच्या क्रमानुसार त्यांच्या विरोधात जाऊ. आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा1 येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.” अशा रीतीने सर्व इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी शहराविरुद्ध एकजूट केली.

मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे? गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.”

परंतु बिन्यामीन लोक आपल्या इस्राएली भाऊबंदाचे ऐकेनात. बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले. बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले. या सर्व सैनिकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावखुरे होते. ते एवढे नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभरदेखील चुकत नसे.

बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते.

इस्राएली लोक वर बेथेल2 येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?”

याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”

इस्राएली लोक दुसर्‍या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला. मग इस्राएली लोक बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली. बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले. परंतु इस्राएली लोकांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले आणि पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी मोर्चा दिला होता, दुसर्‍या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोर्चा दिला. इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?”

याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”

दुसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला. या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.

मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली. आणि इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले. (त्या समयी परमेश्वराचा कराराचा कोश तिथे होता, एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?”

याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”

तेव्हा इस्राएलने गिबियाहच्या सभोवती दबा धरणारे बसविले. तिसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली. बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली. मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.”

सर्व इस्राएली लोक आपल्या ठिकाणाहून उठले आणि बआल-तामार येथे युद्धाची व्यूहरचना केली आणि इस्राएली लोक गेबाच्या पश्चिमेला दबा धरून बसले होते. मग इस्राएलातील निवडलेले दहा हजार तरुण पुरुषांनी गिबियाहवर हल्ला केला. युद्ध एवढे भयंकर झाले की आपल्यावर मोठा अनर्थ येऊन ठेपला आहे, याची बिन्यामीन लोकांना काही कल्पना नव्हती. तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते. तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे.

इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर भरवसा होता. जे दबा धरून बसलेले होते त्यांनी अचानक गिबियाहवर हल्ला केला आणि ते शहरात पसरले आणि पूर्ण शहराचा तलवारीने नाश केला. इस्राएली लोक आणि दबा धरून बसलेले यांच्यात अशी सांकेतिक खूण ठरली होती की शहरातून धुराचा मोठा लोट वर चढेल असे करावे, आणि मग इस्राएली लोक पलटवार करतील.

बिन्यामीन लोकांनी इस्राएली पुरुष (सुमारे तीस) ठार केले आणि ते म्हणाले, “आपण त्यांचा पहिल्या युद्धाप्रमाणेच पराभव करीत आहोत.” परंतु जेव्हा शहरातून धुराचा लोट वर चढू लागला, तेव्हा बिन्यामीन लोकांनी मागे वळून पाहिले आणि संपूर्ण शहरातून धुराचा लोट वर आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले. नंतर इस्राएली लोकांनी पलटवार केला आणि बिन्यामीन लोक घाबरून गेले आणि त्यांना कळून आले की त्यांच्यावर भयंकर संकट आले आहे. म्हणून ते इस्राएली लोकांपुढून रानाकडे पळू लागले, परंतु युद्धापासून वाचू शकले नाही. आणि इस्राएली लोकांनी ते ज्या नगरातून निघाले होते त्यांना तिथेच ठार मारले. त्यांनी बिन्यामीन लोकांचा पाठलाग करीत गिबियाहच्या पूर्वेस त्यांना वेढले आणि त्यांना सहज तुडविले. बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते. जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले.

त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवारधारक मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते. पण त्यापैकी सहाशे पुरुष वळले आणि रानात रिम्मोन खडकावर पळून गेले आणि तिथे ते चार महिने राहिले. मग इस्राएली पुरुष परत बिन्यामीन लोकांकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण नगर व पशू आणि त्यांना जे मिळाले त्या सर्वांना तलवारीने मारले. जी नगरे त्यांना आढळली त्या सर्वांना त्यांनी जाळून भस्मसात केले.

Source notes (2)
  1. Footnote किंवा गेबा
  2. Footnote किंवा परमेश्वराचे घर

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.