Skip to content
BibleKenya

Biblica® Open Marathi Contemporary Version

यशायाह 46

बाबेलची दैवते

बेल नतमस्तक होतो, नबो1 वाकून जातो;

ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात.

या प्रतिमांची नेआण तापदायक,

व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे.

ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात;

हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे,

ते स्वतःच बंदिवासात जातात.

“याकोबाच्या वंशजांनो,

इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका,

तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे,

आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे.

वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत

तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल.

मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन;

मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.

“तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल किंवा माझी बरोबरी कराल?

तुम्हाला माझ्यासारखा असा कोण आढळेल, ज्याच्याशी तुम्ही माझी तुलना कराल?

काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात

व चांदी तराजूत तोलतात;

ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात,

आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात.

ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात;

नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते.

त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही.

कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही;

ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.

“बंडखोरांनो, हे लक्षात ठेवा, विसरू नका,

हे जरा मनावर घ्या.

भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण करा, फार पुरातन काळातील गोष्टी;

मी परमेश्वर आहे, माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही नाही;

मी परमेश्वर आहे आणि माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.

मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो

व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो.

मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील,

आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’

मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला,

त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन.

जे मी बोललो, ते मी घडवून आणणार;

जे मी योजले आहे, ते मी करेनच!

अहो हट्टी अंतःकरणाच्या लोकांनो,

तुम्ही, जे आता माझ्या नीतिमत्वापासून फार दूर गेलेले आहात, माझे ऐका.

मी माझे नीतिमत्व तुमच्याजवळ आणत आहे,

ते फार दूर नाही;

आणि माझ्या तारणास विलंब लागणार नाही.

मी माझे तारण सीयोनाला

माझे वैभव इस्राएलला बहाल करेन.

Source notes (1)
  1. Footnote बाबेलच्या दैवतांची नावे

Biblica® Open Marathi Contemporary Version. Copyright © Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. Source: Open.Bible. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-11-09.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.