Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 18

संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला,

याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.

याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे;

माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो,

माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग1 ते माझे शरणस्थान आहेत.

स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला,

आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.

मृत्यूच्या साखळदंडानी मला जखडले,

नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.

मृतलोकाच्या दोर्‍यांनी माझ्याभोवती वेटोळे केले;

मृत्यूचा पाश मला सामोरा आला.

मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला;

परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली.

त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली;

माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.

तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली,

आणि पर्वताचे पाये हादरले.

याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.

त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला;

भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला,

जळते निखारे त्यातून निघाले.

आकाशाला विभागून याहवेह खाली आले;

घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.

करुबावर आरूढ होऊन ते उडून आले;

वार्‍याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.

अंधकार, व आकाशातील काळे मेघ यांचे आच्छादन;

आपल्या सभोवती त्यांचा मंडप केला आहे.

त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या

आणि गारांचे प्रचंड वादळ बाहेर पडले.

याहवेहने स्वर्गातून गर्जना केली;

परात्पराच्या वाणीचा नाद झाला.

त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली,

मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.

हे याहवेह, तुमच्या धमकीने

तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने

समुद्राचे तळ उघडकीस आले,

आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.

वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले;

खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.

माझ्या बलवान शत्रूपासून

माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.

माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले,

परंतु याहवेह माझे आधार होते.

त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले;

त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.

याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे;

माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.

कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत;

माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.

त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत;

मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.

मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे

आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.

याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार,

त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.

विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात,

व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता,

शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता,

परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.

नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता,

परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता.

याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे;

माझ्या परमेश्वराने माझ्या अंधाराचा प्रकाश केला आहे.

तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो;

माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.

परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे.

याहवेहचे वचन दोषरहित आहे;

जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.

याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे?

आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?

परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात,

आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.

तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात;

कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात.

ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात;

माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.

माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे,

तुमचा उजवा हात मला आधार देतो;

तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.

माझी पावले घसरू नयेत,

म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही मार्ग विस्तृत केला आहे.

मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले;

त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.

मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही,

ते माझ्या पायाखाली पडले.

तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले;

माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.

तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले,

आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.

त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते;

त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

वार्‍यावर उडून जाणार्‍या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला;

रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना तुडवून टाकले.

लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली;

राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला नेमले.

ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,

परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात;

माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.

त्या सर्वांचे धैर्य खचून गेले,

ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात.

याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो!

परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!

परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात,

ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात,

ते माझी माझ्या वैर्‍यांपासून सुटका करतात.

तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे;

हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.

म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन;

मी आपल्या नावाची स्तुती गाईन.

ते आपल्या राजाला महान विजय देतात;

ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर

आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा प्रीती करतात.

Source notes (1)
  1. Footnote किंवा सामर्थ्य

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.