Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता 118
याहवेहचे उपकारस्मरण करा,
कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
इस्राएलने म्हणावे:
“त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे:
“त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
याहवेहचे भय धरणारे म्हणोत,
“त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
संकटात असताना मी याहवेहचा धावा केला;
ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही;
नश्वर मानव मला काय करणार?
याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत.
मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन.
नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा,
याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा,
याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
सर्व राष्ट्रांनी मला वेढा घातला,
परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.
त्यांनी सर्व बाजूने मला वेढा घातला,
परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नायनाट केला.
मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते,
पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले;
याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.
त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो,
परंतु याहवेहने मला साहाय्य केले.
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण1 आहेत;
तेच माझे तारण झाले आहेत.
नीतिमान लोकांच्या घरातून
आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत:
“याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!
याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे;
याहवेहच्या उजव्या भुजेने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!”
मी मरणार नाही तर जगेन,
आणि याहवेहची कृत्ये विदित करेन.
याहवेहने मला कठोर शिक्षा केली,
परंतु त्यांनी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.
माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या;
मी आत प्रवेश करून याहवेहचे उपकारस्मरण करेन.
याहवेहची दारे हीच आहेत;
याच दारातून नीतिमान प्रवेश करतात.
मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले;
तुम्ही माझे तारण झाला आहात.
जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला,
तोच आता कोनशिला झाला आहे;
ही याहवेहची करणी आहे,
आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत आहे.
याहवेहने आज हे केले आहे;
आजच आपण आनंद व उल्लास करू.
याहवेह, आमचे तारण करा!
याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो.
आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
याहवेहच परमेश्वर आहेत;
त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे.
डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी2
मिरवणुकीत सामील व्हा.
तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन;
तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.
याहवेहचे उपकारस्मरण करा,
कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
Source notes (2)
- Footnote किंवा गीत
- Footnote किंवा यज्ञ दोरीने बांधून घेऊन जा
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.