Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यहेज्केल 43

परमेश्वराचे वैभव मंदिरात परत येते

त्यानंतर त्या मनुष्याने मला पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराकडे आणले आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली. जो दृष्टान्त मी पाहिला तो त्या दृष्टान्तासारखा होता जेव्हा तो शहरास नष्ट करण्यास आला होता आणि जो दृष्टान्त मी खेबर नदीकिनारी पाहिला होता त्यासारखा होता, तेव्हा मी उपडा पडलो. पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वारातून याहवेहच्या वैभवाने मंदिरात प्रवेश केला. तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात आणले आणि याहवेहच्या वैभवाने मंदिर भरले.

तो मनुष्य माझ्याशेजारी उभा असता, मंदिरातून कोणी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले. परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या1 अर्पणांद्वारे2 माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत. जेव्हा त्यांनी त्यांचे उंबरठे माझ्या उंबरठ्याशेजारी आणि त्यांच्या द्वाराच्या चौकटी माझ्या चौकटीशेजारी उभारल्या, माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती, त्यांच्या अमंगळ कृत्यांनी त्यांनी माझे पवित्र नाव कलंकित केले. म्हणून माझ्या रागाने मी त्यांचा नाश केला. आता त्यांनी त्यांची वेश्यावृत्ती आणि त्यांच्या राजांसाठी अंत्यविधीची अर्पणे माझ्यापासून दूर करावी आणि मी सर्वकाळ त्यांच्यामध्ये राहीन.

“मानवपुत्रा, इस्राएलाच्या लोकांना मंदिराविषयी स्पष्ट कर, म्हणजे ते त्यांच्या पापाविषयी लज्जित होतील. त्यांनी त्यांच्या परिपूर्णतेबद्दल विचार करावा, आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल जर त्यांना लाज वाटली, तर त्यांना मंदिराच्या आराखड्याबद्दल; म्हणजेच त्याची रचना, बाहेर जाण्याचा व प्रवेश करण्याचा मार्ग; त्याचा संपूर्ण आराखडा आणि त्याचे सर्व विधी नियम याची माहिती दे. ते त्यांच्यासमोर लिही म्हणजे ते त्याच्या आराखड्याशी विश्वासू राहतील आणि त्याचे सर्व नियम पाळतील.

“मंदिराचा हा नियम आहे: पर्वतांच्या माथ्याच्या सभोवतालचा सर्व भाग परमपवित्र असणार. मंदिराचा नियम असाच आहे.

महान वेदीची पुनर्स्थापना

“वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती: भूमीवरील तळभागापासून वेदीच्या सभोवतालच्या खालच्या बैठकीपर्यंतची उंची दोन हात आणि बैठक एक हात3 रुंद आहे. या खालच्या बैठकीपासून वरील बैठकीपर्यंत जे वेदीसभोवती जाते ती चार हात4 उंच आणि ती सुद्धा एक हात रुंद आहे. त्याच्यावरती, वेदीचा अग्निकुंड चार हात उंच, आणि वेदीच्या अग्निकुंडाला जोडून चार शिंगे वर निघाली होती. वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात5 लांब आणि बारा हात रुंद आहे. वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात6 लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात7 आहे. वेदीच्या पायर्‍या पूर्वेकडे आहेत.”

तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे: सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्‍यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर. पापार्पणासाठी तू गोर्‍हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा.

“दुसर्‍या दिवशी पापार्पणासाठी निर्दोष बोकड घ्यावा आणि वेदी शुद्ध करावी, ज्याप्रकारे गोर्‍ह्याद्वारे शुद्ध केली होती. ती शुद्ध केल्यानंतर, एक गोर्‍हा व मेंढरातील एका मेंढ्याचे अर्पण करावे, ते दोन्ही निर्दोष असावेत. त्यांना तू याहवेहसमोर अर्पण करावे आणि याजकांनी त्यांच्यावर मीठ टाकावे आणि होमार्पण म्हणून याहवेहसमोर अर्पण करावे.

“सात दिवस प्रतिदिनी तू एक बोकड पापार्पण म्हणून अर्पण करावा; एक गोर्‍हा व मेंढरातील एक मेंढा आणावा, ते दोन्ही निर्दोष असावेत. सात दिवस त्यांनी वेदीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी; याप्रकारे ते वेदीचे समर्पण करतील. हे दिवस समाप्त झाल्यानंतर, आठव्या दिवसापासून पुढे, याजकांनी तुमची होमार्पणे व शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करावी. तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

Source notes (7)
  1. Footnote किंवा स्मरणार्थ सभा
  2. Footnote किंवा त्यांची उच्च स्थाने
  3. Footnote किंवा 105 सें.मी.उंच व 53 सें.मी. रुंद
  4. Footnote किंवा 2.1 मीटर उंच
  5. Footnote किंवा 6.4 मीटर
  6. Footnote किंवा 7.4 मीटर
  7. Footnote किंवा 27 सें.मी.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.