Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
2 राजे 17
इस्राएलाचा शेवटचा राजा होशे
यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीत वाईट ते केले, परंतु त्याच्यापूर्वी जे इस्राएलचे राजा होऊन गेले त्यांच्याइतके केले नाही.
अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला. परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो1 याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले. आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.
इस्राएल पापांमुळे बंदिवासात जाते
हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले. इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली. त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले. ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली. याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली. याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.”
परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले, त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.
त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली. त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला.
म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले, परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले. यामुळे याहवेहने सर्व इस्राएली लोकांचा त्याग केला; त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटणार्यांच्या हाती दिले व आपल्या उपस्थितीतून काढून टाकले.
जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराेबाेअमास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले. इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही, जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.
शोमरोनात पुनर्वसन झाले
मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले. जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले. अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”
तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.” म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले.
तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले. बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली; अव्वी लोकांनी निभज व तर्ताक केले आणि सफरवी लोकांनी तर अद्राम्मेलेक व अनम्मेलेक या आपल्या दैवतांच्या वेद्यांवर आपल्या मुलामुलींचे अग्नीत बळी दिले. त्यांनी याहवेहची उपासना केली, परंतु त्यांनी त्यांच्या लोकांची उच्च स्थानावरील मंदिरांमध्ये याजक म्हणून नियुक्त केले. ते याहवेहची उपासना करीत असले, तरी ज्या देशातून ते आले होते, त्या देशाच्या चालीरीतींप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या दैवतांची उपासना करीत असत.
ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत. जेव्हा याहवेहने इस्राएली लोकांसोबत करार केला, तेव्हा त्यांनी त्यांना आज्ञा केली: “इतर दैवतांची उपासना करू नका किंवा त्यांना नमन करू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांना यज्ञार्पणे करू नका. परंतु ज्या याहवेहने आपल्या अलौकिक सामर्थ्याने आणि वाढविलेल्या भुजांनी इजिप्तमधून त्यांना बाहेर आणले होते केवळ त्याच याहवेहची तुम्ही उपासना करावी. त्यांनाच तुम्ही नमन करावे आणि त्यांनाच यज्ञार्पणे अर्पण करावी. त्यांनी लिहून दिलेल्या विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा यांचे तुम्ही खात्रीने नेहमी काळजीपूर्वक पालन करावे. इतर दैवतांची उपासना करू नका. मी तुमच्याशी केलेला करार विसरू नका आणि इतर दैवतांची उपासना करू नका. तुम्ही फक्त याहवेह तुमच्या परमेश्वराचीच उपासना करावी; तेव्हा ते तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवितील.”
त्यांनी याहवेहचे ऐकले नाही, परंतु त्यांच्या आधीच्या रीतींना ते चिकटून राहिले. हे लोक याहवेहची उपासना करीत असतानाही ते त्यांच्या मूर्तीची सेवा करीत होते. आजवर त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्या पूर्वजांनी केले तसेच करीत आहेत.
Source notes (1)
- Footnote सो किंवा ओसोक्रोन नावाचे संक्षिप्त रूप
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.