Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

1 थेस्सलनीकाकरांस 2

थेस्सलनीका येथे पौलाचे सेवाकार्य

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमची भेट घेण्यासाठी येणे काही व्यर्थ ठरले नव्हते हे तुम्हाला माहीतच आहे. पूर्वी फिलिप्पैमध्ये आम्हाला दुःख व अपमानकारक वागणूक सहन करावी लागली हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु आमच्या परमेश्वराच्या साहाय्याने भयंकर विरोध असतानाही आम्ही परमेश्वराची शुभवार्ता सांगण्याचे धैर्य केले. जो बोध आम्ही करतो तो अयोग्य किंवा अशुद्ध हेतूने नव्हे किंवा आम्ही तुमची फसवणूक करावी या उद्देशानेही नव्हे. उलट, आम्ही परमेश्वराला मान्य असलेले व जी शुभवार्ता आमच्यावर सोपवून दिली आहे ज्यापुढे बोलतो. आम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर परमेश्वराला करतो जे हृदये पारखणारे आहेत. तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत. आम्ही लोकांकडून म्हणजे, तुमच्याकडून किंवा दुसर्‍या कोणाकडूनही स्तुतीची कधीच अपेक्षा केली नाही. वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता.

जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला. तसेच आम्ही तुमची काळजी घेतली. आम्ही तुमच्यावर एवढी प्रीती केली की आम्ही आनंदाने केवळ परमेश्वराची शुभवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनही देण्यास तयार होतो. बंधू आणि भगिनींनो, आम्ही केलेले कष्ट आणि परिश्रम हे तुम्हाला आठवत असतील; परमेश्वराच्या शुभवार्तेचा प्रचार तुम्हाला करीत असताना आमचे ओझे कोणावर पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम केले. तुमच्यातील प्रत्येकाशी आमचे वागणे पवित्र, नीतीने व निर्दोष होते, याला तुम्ही विश्वासणारे स्वतः आणि परमेश्वर साक्षी आहेत. पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला उत्तेजन, सांत्वन आणि विनंती करून सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या गौरवी राज्यात बोलाविले आहे, त्यांना शोभेल असे जीवन जगा.

परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे. कारण बंधू आणि भगिनींनो, यहूदीयामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये असलेल्या परमेश्वराच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झालात म्हणून स्वतःच्या बांधवांकडून तुम्हाला दुःख सहन करावे लागले, त्याच गोष्टी यहूदी लोकांकडूनही या मंडळ्यांना सहन कराव्या लागल्या. त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले, आम्ही त्यांच्याशी संवाद करू नये, जेणे करून गैरयहूदीयांचे तारण होईल, म्हणून ते आम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते आणि अशा रीतीने त्यांच्या पापांचे माप भरत आले आहे. परंतु आता शेवटी परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर1 आला आहे.

थेस्सलनीकाकरांना भेटण्यास पौलाची ओढ

बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हापासून शरीराने दूर असलो, पण विचाराने नव्हे, आमच्या प्रबळ इच्छेने तुम्हाला भेटण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला. आम्ही तुमच्याकडे येण्याचा, मी स्वतः पौलाने वारंवार प्रयत्न केला. परंतु सैतानाने आम्हाला अडविले. आमची आशा, आमचा आनंद, आपल्या प्रभू येशूंच्या पुनरागमनासमयी त्यांच्या सान्निध्यात जो आमचा आशेचा मुकुट तो काय? ते तुम्हीच आहात ना? कारण तुम्हीच आमचे गौरव आणि आनंद आहात.

Source notes (1)
  1. Footnote किंवा त्यांच्यावर पूर्णपणे आला

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.