Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
1 राजे 10
शबाच्या राणीची शलोमोनास भेट
जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली. शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही राजासाठी कठीण नव्हते. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला, त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.
ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. परंतु मी येथे येऊन या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत त्यावर मी विश्वास ठेवला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. तुमचे लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”
आणि तिने राजाला एकशेवीस तालांत1 सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत.
(त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड2 व मोलवान रत्ने आणली. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)
शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, त्या शिवाय राजाच्या खजिन्यातूनही राजाने तिला भेटी दिल्या. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली.
शलोमोनचे वैभव
शलोमोनला मिळत जाणारे वार्षिक सोने सहाशे सहासष्ट तालांत3 होते, याशिवाय व्यापारी आणि सावकार, अरब देशाचे राजे व देशाच्या राज्यपालांपासून येणारी महसूल ती वेगळीच होती.
शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल4 ठोकलेले सोने लागले होते. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीन मीना5 सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.
नंतर राजाने हस्तिदंताने सजविलेले एक भव्य सिंहासन तयार करून त्याला शुद्ध सोन्याचे आवरण दिले. सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि त्याच्या मागचा भाग गोलाकार होता. आसनाच्या दोन्ही बाजूंना हात होते आणि दोन्ही हातांच्या बाजूंना दोन सिंह केलेले होते. प्रत्येक पायरीवर दोन याप्रमाणे बारा सिंह केलेले होते. याप्रकारचे सिंहासन आणखी इतर राज्यांमध्ये कुठेही नव्हते. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे. हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा6 समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर7 घेऊन परत येत असत.
संपत्ती व ज्ञानाने शलोमोन राजा पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा अधिक महान होता. परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व लोक येत असत. आणि जे लोक येत असत, ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत.
शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे8 वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असत. त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी9 इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते पाठवित असत.
Source notes (9)
- Footnote अंदाजे 4 मेट्रिक टन
- Footnote चंदनाचे लाकूड मूळ भाषेत अलमद
- Footnote अंदाजे 23 मेट्रिक टन
- Footnote अंदाजे 6.9 कि.ग्रॅ.
- Footnote अंदाजे 1.7 कि.ग्रॅ.
- Footnote किंवा तार्शीशची गलबते
- Footnote या इब्री शब्दाचा मूळ अर्थ अनिश्चित आहे
- Footnote किंवा सिलिसिआ
- Footnote अंदाजे 1.7 कि.ग्रॅ.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.