इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 4
सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
प्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र.
मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा.
संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले,
माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार?
किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे.
मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका!
तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा
आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.
बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल?
परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”
त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते,
तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.
मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो,
कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.