Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

गण 31

मिद्यान्यांवर सूड घेणे आणि लुटीचे शुद्धीकरण

परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, इस्राएल लोकांसाठी मिद्यान्याविरूद्ध सूड घे. हे केल्यानंतर तू मरण पावशील आणि त्यानंतर तू तुझ्या लोकांस जाऊन मिळशील.

मग मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील. इस्राएलाच्या प्रत्येक वंशातून एक एक हजार लढाईस पाठवा. इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील. मोशेने प्रत्येक वंशातून एक हजार असे बारा हजार लोकांस लढाईवर पाठवले. त्यांना आणि त्यांच्याबरोबर याजक एलाजाराचा मुलगा फिनहासास पवित्र पात्रे व इशारा देण्यासाठी रणशिंगे त्यांच्या हवाली करून पाठवले. मग मोशेने व एलाजार याजकाने मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर केले. त्यांनी जे लोक मारले त्यामध्ये अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामासही तलवारीने मारले.

इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करून नेले. त्यांनी त्यांची सर्व गुरे व त्यांचे सर्व कळप व सर्व धन लूट म्हणून त्यांनी घेतले. त्यांनी त्यांची सर्व वस्तीची नगरे व त्यांच्या सर्व छावण्याही जाळल्या.

त्यांनी त्यांची सर्व लूट व बंदीवान, दोन्ही लोक आणि जनावरे बरोबर घेतली. यरीहोपाशी यार्देनतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, याजक एलाजार आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांना आणले.

नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले. जे सैनिकांचे सेनापती युद्धावरुन परतले होते एक हजार सैनिकांच्या प्रमुखावर आणि शंभर सैनिकांच्या प्रमुखावर मोशे खूप रागावला. मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?

पाहा ह्यांनीच बलामाच्या मसलतीवरून पौराच्या प्रकरणी इस्राएलाच्या वंशाना परमेश्वराविरूद्ध अपराध करायला लावले. यावरुन परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली. आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.

“आणि नंतर तुमच्यापैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर रहावे. तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर रहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा. तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”

नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड, पत्रा किंवा शिसे वगैरे जे काही अग्नीत टिकेल ते तुम्ही अग्नीत घालून काढा ते शुद्ध होईल: तरी अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याने ते शुद्ध करावे आणि जे काही अग्नीत टिकणार नाही ते पाण्याने धुवावे. सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.”

लुटीची वाटणी

नंतर परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी. नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलाच्या इतर लोकात त्यांची वाटणी करा.

युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भागातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा. त्यांच्या हिश्श्यातून घेऊन तो परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश म्हणून याजक एलाजाराला द्यावा.

“नंतर इस्राएल लोकांस मिळालेल्या हिश्श्यातून माणसे, गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाची रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे.” परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजकाने केले.

सैनिकांनी लुटून घेतलेल्या वस्तूंशिवाय सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे, बहात्तर हजार गाईबैल, एकसष्ट हजार गाढवे आणि बत्तीस हजार स्त्रिया आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे).

युद्धावर गेलेल्या सैनिकांना तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या मिळाल्या. त्यांनी सहाशे पंच्याहत्तर मेंढ्या परमेश्वरास दिल्या. गाईबैल छत्तीस हजार असून त्यातील बहात्तर परमेश्वराचा कर होते.

सैनिकांना तीस हजार पाचशे गाढवे मिळाली. त्यातील एकसष्ट गाढवे त्यांनी परमेश्वरास दिले. सैनिकांना सोळा हजार स्त्रिया मिळाल्या. त्यांपैकी बत्तीस स्त्रिया त्यांनी परमेश्वरास दिल्या. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने याजक एलाजाराला दिल्या.

नंतर युद्धावर गेलेल्या इस्राएली सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता. लोकांस तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या. छत्तीस हजार गाईबैल, गाढवे तीस हजार पाचशे आणि सोळा हजार स्त्रिया मिळाल्या.

आणि इस्राएलाच्या वंशाच्या अर्ध्या भागातून, मनुष्यातून व जनावरांतून प्रत्येक पन्नास वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यामध्ये पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवासमंडपाची काळजी घेतली.

नंतर सैनिकांचे पुढारी सहस्त्राधिपती सैनिकांचे व शताधिपती सैनिकांचे पुढारी मोशेकडे आले. त्यांनी मोशेला सांगितले, आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.

म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेश्वराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत; बाजूबंद, बांगडया, आंगठ्या, कुड्या आणि हार. ही आम्ही परमेश्वरास अर्पण म्हणून आमच्या जिवासाठी परमेश्वरारासमोर प्रायश्चित करण्याकरता आणली आहेत. मोशे आणि एलाजार याजकाने ते सर्व सोने व घडीव वस्तू त्यांच्याकडून स्विकारल्या.

सहस्त्रपती आणि शतपती ह्यांनी परमेश्वरास समर्पण केलेले सोने सोळा हजार सातशे शेकेल भरले. सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वतःजवळ ठेवल्या. मोशे आणि एलाजार याजक यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेऊन इस्राएल लोकांसाठी परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपामध्ये नेऊन ठेवले.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.