Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

गण 1

सीनाय येथे झालेली इस्त्राएल लोकांची शिरगणती

2 शमु. 24:1-19; 2 इति. 21:20

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला, सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर. वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.

प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील. तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः

रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर; शिमोन वंशातला सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल.

यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;

इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;

जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब.

योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.

बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान.

दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;

आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;

गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;

नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.

हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते.

ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले; आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.

इस्राएलाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्याच्याप्रमाणे करण्यात आली. रऊबेनाच्या वंशातले मोजलेले एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.

शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; शिमोनाच्या वंशातले मोजलेले एकूण एकोणसाठ हजार तीनशे भरली.

गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.

यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली; यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.

इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली; इस्साखाराच्या वंशातले मोजलेले एकूण चौपन्न हजार चारशे भरली.

जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली; जबुलून वंशातील मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.

योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; एफ्राइमाच्या वंशातले मोजलेले एकूण चाळीस हजार पाचशे भरली.

मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; मनश्शेच्या वंशात मोजलेले एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.

बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण पस्तीस हजार चारशे भरली.

दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली.

आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.

नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली. नफतालीच्या वंशातील मोजलेले एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.

मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली. इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली. ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.

निवासमंडपाच्या सेवेसाठी लेवी लोकांची नेमणूक

इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती. परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको.

लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी. जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्यास जिवे मारावे. इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ द्यावेत.

परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.